पैठण, (प्रतिनिधी) सार्वजनिक बांधकाम विभागातील विकासकामांची गुणवत्ता, कार्यक्षम नियोजन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत पैठण तालुक्यातील पाचोड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय सहाय्यक अभियंता राजेंद्र बोरकर यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अभियंता दिनानिमित्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. बोरकर यांनी आपल्या कार्यक्षेत्रात विविध विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी करताना कामांच्या गुणवत्तेला कुठेही तडजोड न करता प्राधान्य दिले.
तसेच तांत्रिक बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी आणि कामांवर सातत्याने देखरेख ठेवत दर्जेदार कामे पूर्ण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची विभागाने दखल घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता रूपा राऊळ, जलसंपदा विभागाच्या अभियंता सुनंदा जगताप आणि अधीक्षक अभियंता एस. एस. भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत बोरकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार मिळाल्यानंतर राजेंद्र बोरकर यांचे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच अभियंता क्षेत्रातील सहकाऱ्यांनी अभिनंदन केले. त्यांच्या या सन्मानामुळे पैठणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे, या बदल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले.












